उरण : उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका आहे. दळणा वळणाच्या दृष्टीने उरण तालुका आता विकसित होत चालला आहे. उरणला रेल्वे सेवा सुरु झाली रेल्वे मुळे हळू हळू कनेक्टीव्हीटी वाढत आहेत.नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु होणार आहे.त्यातच आता बेस्ट सेवेने भर टाकली आहे. उरण मधून मुंबई कुलाबा, नवी मुंबई जाण्यासाठी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेची बेस्ट सेवा सुरु करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे नागरिकांनी उरण ते मुंबई , उरण ते नवी मुंबई बेस्ट बस सेवा सुरु होण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.
उरण मधील द्रोणागिरी सेक्टर १२ येथे भूपाळी गृह संकुल (सोसायटी )मध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी उरण ते अटलसेतू मार्गा मुंबई या मार्गावर बेस्ट बस सेवा सुरु करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तुषार उत्तम गायकवाड यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून बेस्ट प्रशासनाने उरण ते बांद्रा स्टेशन पुर्व, उरण ते अटलसेतू मार्गा मुंबई कुलाबा, उरण ते वाशी अशी बस सेवा सुरु केल्याने प्रवाशी वर्गांनी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई अशी सेवा सुरु झाली आहे. नागरिकांनी, चाकरमानी विद्यार्थी प्रवाशी वर्गांनी याचे श्रेय सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांना दिले आहे. शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भूपाळी गृह संकुल सोसायटी द्रोणागिरी सेक्टर १२ येथून पहिली व दुसरी बस मुंबई व नवी मुंबई कडे रवाना झाल्या.
बस सेवा सुरु झाल्या.यावेळी एकूण २ बस आल्या होत्या. या बसेसचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ रजि. द्रोणागिरीचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार,भैरवी सोसायटी अध्यक्ष नवनाथ डोके,भूपाळी सोसायटी सेक्रेटरी लक्ष्मण मोटे,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खंडागळे, भूपाळी सोसायटी, भैरवी सोसायटी, मल्हार सोसायटी नागरिक, ग्रामस्थांनी केले. तर बेस्ट प्रशासनाच्या वतीने परिवहन सेवा चलो बस सेवेचे इन्स्पेक्टर भागवत कांबळे, इन्स्पेक्टर प्रमोद कोकरे उपस्थित होते. या बस सेवेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी नारळ फोडून व सर्वांना पेढे वाटून केले.
या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे तुषार उत्तम गायकवाड यांनी स्वागत केले.आभार व्यक्त करताना तुषार उत्तम गायकवाड म्हणाले कि गेली अनेक वर्षांपासून उरण , द्रोणागिरी सिडको सोसायटी मधील नागरिकांना मुंबई व नवी मुंबई मध्ये प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रवाशी वर्गांचे अडचणी कमी व्हाव्यात, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना जलद व उत्तम सेवा मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालू होते. बेस्ट प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा सुरु होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता उरण मधून मुंबई, नवी मुंबई जाण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बस सेवा सुरु केली आहे.बेस्ट बस सेवा सुरु केल्याने मी बेस्ट प्रशासनाचे आभार मानतो. तसेच उपस्थित सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो. उरण व द्रोणागिरी परिसरातील नागरिकांनी या बेस्ट सेवेचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा. प्रवाशी वाढले तर अजून चांगली सेवा उरणच्या नागरिकांना मिळेल, सेवा सुरळीतपणे चालू राहिल. त्यामुळे बेस्ट बस सेवेचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन तुषार उत्तम गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक द्रोणागिरी रजि. संघाचे अध्यक्ष नामदेव कुरणे यांनी देखील मनोगत व्यक्त करत चांगली सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल बेस्ट प्रशासन व तुषार उत्तम गायकवाड यांचे आभार मानले. उरणला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा महामंडळच्या बसेसच्या फेऱ्या कमी आहेत. शिवाय त्या फेऱ्या वेळेत नाहीत. नागरिकांना कुठेही वेळेत प्रवास करता येत नाही. तसेच रेल्वे सेवा फक्त नवी मुंबई पर्यंतच आहे. त्यामुळे दररोज चाकरमानी नोकरी धंदा निमित्त उरण ते मुंबई, मुंबई ते उरण या मार्गाने प्रवास करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी अधिकारी, व्यापारी, उद्योजक यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.
आता मात्र सध्या सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, सिडको जेएनपीटी ते मुंबई आणि सिडको जेएनपीटी ते ब्रांद्रा स्टेशन पुर्व असा प्रवास बेस्टच्या बसने करता येणार आहे. बस मार्गाचा नंबर चलो ऍप मध्ये दाखवत आहे. बेस्टने प्रीमियम चलो बस या मार्गावर सुरु केल्याने प्रवाशी वर्गांचे वेळेची बचत होणार आहे. या बेस्टच्या सेवेने नागरिकांना ऐसी मध्ये गारेगार थंड वातावरणात आरामदायी शांततेत प्रवास करता येणार आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा सुरु झाल्याने नागरिकांनी, प्रवाशी वर्गांनी बेस्ट प्रशासनाचे व सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांचे आभार मानले आहेत.
बेस्ट परिवहन चलोबस सेवेची वैशिष्ट्य :-
🟥 रविवार खेरीज सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, सिडको जेएनपीटी ते मुंबई (बांद्रा ), सिडको जेएनपीटी ते अटलसेतू मार्गा मुंबई या मार्गावर बस सेवा सुरु.
🟥 रात्री ९ ते रात्री १२:३० या वेळेत सिडको जेएनपीटी ते वाशी, वाशी ते सिडको जेएनपीटी अशी स्वतंत्र बस सेवा सुरु
🟥कायमस्वरूपी ऑनलाईन सेवा आहे. नागरिकांना बस मधून प्रवास करायचे असल्यास चलो बस ऍप डाउनलोड करून ऑनलाईन नोंदणी करूनच बस मध्ये बसावे लागेल
🟥ऑनलाईन नोंदणी किंवा ऑनलाईन बुकिंग केलेले नसेल तर बस मध्ये बसता येणार नाही.
🟥प्रवाशी कुठेही असला तरी त्याने अगोदर ऑनलाईन नोंदणी (बुकिंग )केली तर त्याला बस मधून प्रवास करता येतो.
🟥चलो बस ऍप मध्ये कोणती बस कुठे आहे. एखादी बस कोणत्या स्थानकावर हे ऍप मध्ये त्वरित कळणार.
🟥प्रीमियम सेवा (व्ही आय पी सेवा )असल्याने ऑफलाईन सेवा कायमस्वरूपी बंद आहे. म्हणजेच प्रवाशांना कधीही कुठेही डायरेक्ट बस मध्ये चढता येणार नाही. ऑनलाईन बुकिंग असेल तरच बस मधून प्रवास करता येणार आहे.
🟥द्रोणागिरी ते अटल सेतू मार्गे मंत्रालय मुंबई अशी बस सेवा सुरु.
🟥 सिडको जेएनपीटी ते बांद्रा
सिडको जेएनपीटी ते वाशी (नवी मुंबई )
🟥थंड, वातानुकुलीत शांत आरामदायी प्रवास सेवा
🟥जलद, सुरक्षित व उत्तम सेवा
🟥कोणत्याही नागरिकांना चलो बस सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर चलो बस सेवा ऍप डाउनलोड करूनच प्रवास करावा लागेल. ही बुकिंग २४ तास उपलब्ध आहे.
🟥बस सेवेचे वेळापत्रक हे चलो बस ऍप वर पाहता येणार आहे
🟥बस तिकीटाची रक्कम ऑनलाईन बुकींग करतेवेळी दिसून येईल.