छत्रपती संभाजीनगर :– महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ होत आहे. राज्याला दिशा देणारे आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको येथे हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण, दुगधविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. राजकारणात विविध पदावर काम करताना महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याचे देखील काम केले. बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली. समाजाला शिक्षणाकडे वळविण्यासाठी अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली असून समाजातल्या विविध परंपरा जोपासल्या पाहिजेत यासाठीही त्यांनी प्रयत्न केला, राजकीय सामाजिक जीवनामध्ये नगराध्यक्ष पदापासून आमदार, खासदार, मुख्यमंत्री अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून दिवंगत नाईक साहेबांच्या नावाची नोंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील 1972 च्या भीषण दुष्काळात राज्याला जलसंधारणातून दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय दिवगंत वसंतराव नाईक यांनी घेतला.“महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा असेल तर जलसंधारण हाच एकमेव मार्ग आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब साठवा, जमिनीतील पाणी वाढवा, वाहून जाणारी माती रोखा तरच शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल, असा विचार त्यांनी रूजविला. दिवंगत वसंतराव नाईक साहेबांनी राज्यात व्यापक स्वरूपात जलसंधारणाची कामे सुरू करून जलक्रांतीची पायाभरणी केली. महाराष्ट्र अन्नधान्यांच्या बाबतीत समृद्ध व स्वयंपूर्ण व्हावा, हा त्यांचा स्पष्ट हेतू होता. महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करून मोठे परिवर्तन घडवून आणले आणि ते पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरले. दुष्काळाचा सामना करताना इतिहासाचा मागोवा घेतल्यावर हे प्रकर्षाने जाणवले की, दुष्काळाशी लढण्याचा खरा मार्ग म्हणजे नाईक साहेबांनी दाखविलेला जलसंधारणाचा मार्ग. त्याच प्रेरणेने पुढे जलयुक्त शिवार ही राज्यव्यापी योजना तयार करण्यात आली. या योजनेद्वारे महाराष्ट्रभर जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. योजना तयार करत असताना अनेक व्यक्ती प्रेरणास्थान म्हणून आमच्यासमोर होत्या; परंतू या संपूर्ण उपक्रमामागील मूळ प्रेरणास्थान म्हणजे वसंतराव नाईक साहेबच, हे आपण त्या काळातही स्पष्टपणे नमूद केल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला.
दिवगंत वसंतराव नाईक साहेबांनी राज्यात कृषी व जलसंधारणाबरोबरच बंजारा समाजासाठीही मोठ्या प्रमाणात जागृती व विकासाची चळवळ उभी केली. तांड्यावर राहणारा, परंपरेने श्रमप्रधान पण विकासापासून दूर राहिलेला हा समाज एकेकाळी मार्गनिर्मिती, बावड्या बांधकामे आणि पायाभूत कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा, समृद्ध इतिहास असलेला समाज आहे. पोहरादेवी येथे सेवालाल महाराजांनी बंजारा समाजासाठी निर्माण केलेली ‘काशी’ अधिक भव्य, आधुनिक आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारी व्हावी, यासाठी सरकारने 700 कोटी रुपयांचा समग्र विकास आराखडा राबविला. त्यामुळे पोहरादेवीचा संपूर्ण कायापालट झाला असून आज ते राज्यातील महत्त्वाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्र बनले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रथमच बंजारा काशी पोहरादेवीला भेट देत म्युझियमचे उद्घाटन केले. याशिवाय म्युझियममध्ये प्रवेश करताना पहिला पुतळा दिवंगत वसंतराव नाईक साहेबांचा स्थापित करण्यात आला आहे. समाजउन्नती, जागृती आणि परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या नाईक साहेबांच्या कार्याचा हा सन्मान असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आज दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण होत आहे, हा दिवस खऱ्या अर्थाने बंजारा समाजासह आपल्या सर्वांसाठी दिवाळीप्रमाणेच आहे. महानगर वेगाने वाढत असून महानगर सुंदर झाले पाहिजे, कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक छत्रपती संभाजीनगर येथे येतील, त्यादृष्टीने शहराच्या रस्ते तसेच सर्वांगिण विकासासाठी निधीची तरतूद गरजेची असल्याचे ते म्हणाले. दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळा आपल्या सर्वांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.