उरण : उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार असून त्या संदर्भात अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२५ होती. यावेळी भाजपा स्व बळावर स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. मात्र महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) व शिवसेना (शिंदे गट ) यांना उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी विश्वासात न घेतल्याने व जागा सुद्धा न दिल्याने शेवटी शिवसेना(शिंदे गट )व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजितदादा पवार गट ),आर पी आय, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी एकत्र येत आज उरण नगर परिषदेत ७ नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांच्याकडे सुपूर्द केले.
उरण मध्ये सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल भगत यांच्या जनसंपर्क कार्यालय कामठा उरण शहर येथून रॅली काढण्यात आली.हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून रॅलीला सुरवात करण्यात आली.या रॅलीत पुरुषा सोबत महिलांचाही सहभाग लक्षनीय होता. यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. रॅली सुरु झाल्या नंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली तुषार ठाकूर यांनी विमला तलाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला.गणपती चौक मार्गे स्वामी विवेकानंद चौक, शेवटी उरण नगर परिषद अशा मार्गाने रॅली जाऊन शेवटी नगर परिषदेच्या गेटजवळ रॅलीचा समारोप झाला.शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली तुषार ठाकूर व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. या वेळी शिवसेनेचे उपनेते सुहास सामंत,जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे, जिल्हा संघटिका मेघाताई दमडे, जिल्हा संघटिका वैजयंती ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, उरण विधानसभा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष समत भोंगले, तालुका प्रमुख दिपक ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटिल, उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, तुषार ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अतुल भगत यांनी विजय हा आमचाच असेल भरघोस मतांनी आमचा विजय होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला तर उरणच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली तुषार ठाकूर यांनी केले.उरण नगर परिषदेत एकूण १० प्रभाग असून २१ नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबर रोजी निवडणुका होत आहेत.उरण नगर परिषदेत आता नगराध्यक्ष च्या पदासाठी एकूण ३ उमेदवारांनी अर्ज भरल्याने यंदाची नगराध्यक्ष पदाची निवडणूक व नगरसेवक पदाच्या निवडणुक या तिरंगी लढत होणार आहे.भाजपा, महाविकास आघाडी व शिवसेना महायुती अशी तिरंगी लढत उरण नगर परिषद निवडणुकीत पहावयास मिळणार आहे.