सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 राज्य

महाराष्ट्राच्या दालनाने राष्ट्रीय राजधानीत राज्याचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक उद्योगशक्ती अधोरेखित – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

डिजिटल पुणे    18-11-2025 12:09:32

नवी दिल्ली  : महाराष्ट्राचे दालन राष्ट्रीय राजधानीत राज्याचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक उद्योगशक्ती अधोरेखित करते. हे आपल्या उद्योगविश्वासाठी आणि संस्कृतीसाठी अभिमानास्पद आहे, असे मत महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) श्री. सुशील गायकवाड यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिल्यानंतर व्यक्त केले.

यावर्षी महाराष्ट्राला मिळालेल्या ‘भागीदार राज्य’ या विशेष दर्जामुळे राज्याचे दालन संपूर्ण मेळ्याचे विशेष आकर्षण ठरले आहे. राज्याची ऐतिहासिक परंपरा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, आधुनिक औद्योगिक प्रगती, ग्रामीण महिलांची उद्योजकता, तसेच विविध पारंपरिक हस्तकला आणि नवउद्योजकांच्या संकल्पना यांचा समन्वय साधणारे हे दालन महाराष्ट्राच्या सर्वंकष विकासाचे दर्शन घडवते.

भेटीदरम्यान गायकवाड यांनी दालनातील विविध विभाग व स्टॉल्सची सविस्तर पाहणी केली. त्यांनी स्वयं-साहाय्य गटातील महिलांनी सादर केलेले ताजे व पारंपरिक खाद्यपदार्थ, राज्याच्या भाषिक अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘मराठी भाषा दालना’चे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण यांचा विशेष गौरव केला.

तसेच पैठणी साड्यांचे विणकर, कोल्हापुरी चप्पल कारागीर, चामड्याच्या वस्तू निर्माते, हॅंड पेंटिंग कलाकार आणि ऑर्गॅनिक उत्पादने तयार करणारे उद्योजक यांच्याशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन देत राज्य सरकारच्या धोरणांमुळे अशा स्टॉल्सला मिळणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील संधींचे त्यांनी कौतुक केले.

गायकवाड यांच्या या भेटीप्रसंगी सहायक निवासी आयुक्त श्री. नितीन शेंडे उपस्थित होते. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दालन उभारणीची संकल्पना, त्यामागील उद्दिष्टे, सहभागी विभाग आणि जिल्ह्यांची माहिती, तसेच संपूर्ण सादरीकरणाची रचना याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती