मुंबई : उद्योजक स्वतःच्या कष्टातून उद्योग उभारतात, तंत्रज्ञानाची जोड, विकासाला चालना, आधुनिक साधने यांची उपलब्धता करून दिल्यास हे उद्योजक चमत्कार घडवू शकतात. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लघु आणि मध्यम उद्योग असून हे क्षेत्र राज्याच्या प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (युनिडो) यांच्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि इनोव्हेशन क्षेत्रातील सहकार्यासाठी हेतुपत्र (लेटर ऑफ इंडेट) वाटप करण्यात आले, या करारामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वीकाराला गती मिळणार असून, विशेषतः एमएसएमई उद्योगांना जागतिक स्पर्धात्मकतेकडे नेण्यास मोठी मदत होणार आहे.
युनिडो ही जागतिक स्तरावर टिकाऊ आणि समावेशक औद्योगिक विकासाला पाठबळ देणारी प्रमुख संस्था आहे. तर इंडिया एसएमई फोरम (आयएसएफ) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे प्रशिक्षण, आउटरीच आणि उद्योग स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. दोन्ही संस्थांच्या अनुभवाचा लाभ महाराष्ट्राला तंत्रज्ञान-आधारित औद्योगिक वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.राज्यातील औद्योगिक क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, एव्ही/व्हीआर, ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4.0 सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर युनिडोच्या तांत्रिक ज्ञानाचा आधार घेत महाराष्ट्रात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मजबूत परिसंस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे येथे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा प्रस्ताव असून महत्त्वाच्या औद्योगिक क्लस्टर्समध्ये क्षेत्रनिहाय “स्पोक सेंटर्स” उभारले जाणार आहेत.या संरचित मॉडेलमुळे मोठ्या उद्योग आणि एमएसएमई यांच्यातील डिजिटल दरी कमी होईल, औद्योगिक व्हॅल्यू चेन मजबूत होईल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. तसेच राज्याच्या इनोव्हेशन-ड्रिव्हन आणि टिकाऊ आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांना मोठी गती मिळणार आहे.