मालेगाव :मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे.आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत मालेगावात भव्य मोर्चा काढण्यात आला, ज्यात महिलांचा मोठा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करत न्यायालयाच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली, ज्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ मालेगावात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संपताच जमाव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.या घटनेच्या निषेधार्थ मालेगावात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.“चिमुकलीचा बदला फाशीच” अशा घोषणांसह नागरिकांनी निषेध व्यक्त केला.मोर्चा संपल्यानंतर अचानक जमाव आक्रोशित झाला.संतापलेल्या जमावाने न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला.तसेच न्यायालयाच्या दरवाजावर चप्पल फेकून मारण्यात आल्या.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढले.यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील मोर्चात सहभागी झाले होते. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशी द्या, अशी त्यांनी मागणी केली.