दुबई : दुबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय दुबई एअर शो 2025 दरम्यान आज एक मोठी दुर्घटना घडली. भारतीय वायुसेनेचे स्वदेशी बनावटीचे तेजस (LCA Tejas) लढाऊ विमान प्रात्यक्षिक उड्डाणादरम्यान अचानक कोसळले.
घटना कशी घडली?
स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 वाजता तेजस विमानाने डेमो फ्लाइट करत असताना अचानक नियंत्रण सुटल्याचे दिसून आले आणि काही क्षणांतच ते अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले.विमान जमिनीवर आदळताच प्रचंड स्फोट झाला आणि आगीचे ज्वाळा व काळ्या धुराचे लोट आकाशात उंच झेपावले. एअर शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
पायलटची माहिती अस्पष्ट
अपघातानंतर पायलटने इजेक्शन सीटद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत प्रतिक्रिया किंवा पायलटची स्थिती याबाबत भारतीय वायुसेनेने अद्याप माहिती जाहीर केलेली नाही.
भारतासाठी धक्का
तेजस लढाऊ विमान हे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील महत्त्वाचे पाऊल मानले जाते. दुबई एअर शोमध्ये सलग तिसऱ्यांदा भारताने तेजसची कामगिरी प्रदर्शित करत होते. या अपघातामुळे भारताच्या एरोस्पेस क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे राहत नसले तरी ही घटना निश्चितच मोठा धक्का मानली जात आहे.
दुसरी मोठी घटना
यापूर्वी 2024 मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे युद्धाभ्यासादरम्यान इंजिन बिघाडामुळे तेजस विमान कोसळले होते. दुबईतील आजची दुर्घटना ही तेजसची सलग दुसरी गंभीर घटना आहे.
कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना
या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. ही समिती अपघाताचे कारण, तांत्रिक त्रुटी, मानवी चुका किंवा बाह्य कारणे यांचे विश्लेषण करेल.
कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजे काय?
कोर्ट ऑफ इन्क्वायरी ही तिन्ही संरक्षण दलांत कोणतीही गंभीर घटना – विमान अपघात, मृत्यू, ऑपरेशनल चूक किंवा आपत्ती – यांचे मूळ कारण शोधण्यासाठी नियुक्त केलेली औपचारिक तपास समिती असते.ही समिती फक्त तपास करते; दोषी आढळल्यास पुढील कारवाई स्वतंत्र प्रक्रियेनुसार केली जाते.