पुणे : सदाशिव पेठ परिसरात गेली २० वर्षे सेवा देणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाची अमूल्य छाप सोडली आहे. २० नोव्हेंबर रोजी दारोदार कचरा संकलन करत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग आढळली. सुरुवातीला साधी औषधांची बॅग असावी असे वाटून त्यांनी ती सुरक्षित ठेवली. मात्र बॅग उघडताच आत तब्बल दहा लाखांची रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.
परिसरात दीर्घकाळ काम केल्यामुळे अंजू माने यांना बहुतेक चेहरे परिचित होते. स्थानिक परिसरातील प्रत्येक चेहरा ओळखणाऱ्या अंजू ताईंनी तत्काळ चौकशी सुरू केली. त्याचदरम्यान एक नागरिक अतिशय चिंतेत काहीतरी हरविल्याची घाईघाईने शोध घेताना दिसले. अंजू माने यांनी त्यांना शांत बसवून पाणी दिले आणि ओळख पटून अत्यंत प्रामाणिकपणे ती बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली.
या प्रामाणिकतेने भारावून त्या नागरिकांनी तसेच परिसरातील रहिवाशांनी अंजू ताईंवर साडी आणि रोख रक्कम देऊन सत्कार केला.कृतज्ञतेने भारावलेल्या या क्षणी अंजू माने यांच्याही डोळ्यात अश्रू दाटले.
गेल्या दोन दशकांत ‘स्वच्छ’ मॉडेलने कचरा वेचक आणि नागरिक यांच्यात विश्वासाची जी नाती निर्माण केली, ती आजही तितकीच मजबूत असल्याचे या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. पुण्यातील ४० लाख नागरिकांची सेवा करणाऱ्या ‘स्वच्छ’च्या ४००० कामगारांमध्ये असा प्रामाणिकपणा हेच त्यांच्या कामाचे खरे बळ आहे. अंजू ताईंच्या सत्यनिष्ठेला मनःपूर्वक सलाम!