सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
  • मनसेची साथ सोडा, मुंबईत आमच्यासोबत या; काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर
  • दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; स्फोटानंतर धुराचे लोट, पायलटबाबत अद्याप अनिश्‍चितता
  • भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, त्यांच्याच जागा बिनविरोध कशा होतात? रोहित पवारांचा हल्लाबोल
  • बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
 जिल्हा

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

डिजिटल पुणे    22-11-2025 12:38:42

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेला ‘तुमचे पैसे, तुमचा हक्क’ हा उपक्रम निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबधित खातेदारास, त्यांच्या वारसांना विनासायास परत मिळण्यासाठी उपयुक्त असून सर्वच बँकांनी या उपक्रमाची अधिकाधिक जनजागृती करावी. तसेच बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढविण्यास आणि ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणण्यास सर्व बँकांच्या माहिती तंत्रज्ञान विभागांनी भारत निवडणूक आयोगाच्या धर्तीवर डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

बँक ऑफ बडोदा या जिल्हा अग्रणी बँकेमार्फत मुंबई शहर जिल्ह्यामध्ये  हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा याविषयी यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पुनित पांचोली, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील शर्मा, कॅनरा  बँकेचे मुख्य महाप्रबंधक रणजीव कुमार, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक सुनील शर्मा, युनियन बँकेचे महाप्रबंधक शलजकुमार सिन्हा, पंजाब नॅशनल बँकेच्या महाप्रबंधक श्रीमती भुवनेश्वरी, युको बँकेचे महाप्रबंधक संदीप कुमार यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी, खातेदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानामुळे खातेदारांचे स्पेलिंग बदललेले नाव, आडनावातील बदल किंवा वेगळे फोटो असले तरी समान खातेधारक ओळखणे सोपे होईल. या तंत्रज्ञानामुळे अनक्लेम्ड रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. बँक खातेदारांनीही ई-केवायसी, वारस नोंद आणि पत्त्यामधील बदल बँकेस वेळेत कळविणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कागदपत्रामुळे खात्यातील रकमेची माहिती कुटुंबीयांना सहज मिळू शकेल व खाती निष्क्रीय राहणार नाहीत. तसेच त्या खात्यांमधील रक्कम, खातेदारास, वारसांना तातडीने परत मिळेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांमध्ये असलेल्या सुमारे सहा हजार कोटी रुपयांपैकी दोन ते अडीच हजार कोटी रुपये फक्त मुंबईमधील असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी सांगितले. सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या मुंबईत कामासाठी येणाऱ्या आणि नंतर गावाकडे परतलेल्या नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणात निष्क्रिय खाती तयार होतात. ग्रामीण भागात अशा खात्यांचा शोध घेणे सोपे असले तरी महानगरात हे मोठे आव्हान ठरते, असेही आंचल गोयल यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पांचोली म्हणाले, निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबंधित व्यक्तीला सुपूर्द करणे महत्वाचे आहे. ते म्हणाले अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता अशा निष्क्रिय खात्यांचा दुरुपयोग होण्याची भीती असते. त्यामुळे खातेदारांनी आपली बँक खाती सक्रिय ठेवण्यासाठी वेळोवेळी केवायसी, ई केवायसी करावी.

यावेळी बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक सुनील शर्मा, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुनील शर्मा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उप महाप्रबंधक ज्योती सक्सेना यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरूपात निष्क्रीय खात्यांच्या दावा प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. बँक ऑफ बडोदा जिल्हा अग्रणी प्रबंधक उत्तम गुरव यांनी आभार मानले.


 Give Feedback



 जाहिराती