पुणे : डॉ. आनंद करंदीकर हे जाती व्यवस्था न पाळणारे (डीकास्ट झालेले) पुरोगामी कार्यकर्ते, विचारवंत, लेखक होते. जातीअंतासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत झटत राहिले. दुर्बल, मागास, कष्टकरी, भटके विमुक्त, महिला अशा विविध समाज घटकांशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली होती, अशा शब्दात पुण्यातील पुरोगामी संस्था संघटनांचे कार्यकर्ते आणि विचारवंत अभ्यासक यांनी डॉ. करंदीकर यांच्या आठवणी जागवल्या.
डॉ. आनंद करंदीकर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील पुरोगामी संस्था संघटनांनी सभेचे आयोजन केले होते. श्रमिक भवन येथे ही सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि डॉ. करंदीकर यांच्या साथीदार सरिता आवाड होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि भूमिका विशाल विमल यांनी मांडली, तर प्रास्ताविक सुदर्शन चखाले यांनी यांनी केले. विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अन्वर राजन, अनंत फडके, धम्मसंगिनी रमा गोरख, मुक्ता मनोहर, त्रिवेणी गव्हाणे, विनोद शिरसाठ, गीताली वि. म., शमसुद्दीन तांबोळी, अनिकेत माळी, अच्युत गोडबोले, इब्राहिम खान, अजित अभ्यंकर, किशोर ढमाले, अनिकेत साळवे, प्रशांत कांबळे, रूपाली जाधव, दत्ता देसाई, प्रियदर्शन सहस्रबुद्धे, भूषण भुजबळ आदी कार्यकर्ते मान्यवर अभ्यासकांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.
डॉ. आनंद करंदीकर हे अत्यंत प्रेमळ, मनमोकळे, उत्साही, पारदर्शी, हास्यविनोदी व्यक्तिमत्त्व होते. ते अभ्यासू, चिकित्सक आणि नवनवीन कल्पना घेऊन सतत कार्यरत असायचे. तरुणाईसाठी डॉ. करंदीकर हे खूपच आशादायी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. तरुणांशी मित्रत्वाच्या पातळीवर मोकळेपणाने त्यांचे संबंध होते. तरुणांना संधी, पाठबळ, दिशा आणि मदत करण्याची त्यांची अनोखी पद्धत होती. डॉ. करंदीकर यांचे आयआयटी कलकत्ता येथून बी. टेक, आयआयएममधून एमबीए आणि पीएचडी झाली होती. ते कविवर्य विंदा करंदीकर यांचे चिरंजीव होते. पण त्यांनी कधीही हे प्रिव्हिलेज मिरविले नाही.
सुरवातीच्या काळात युवक क्रांती दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यामाध्यमातून त्यांनी काम केले. अलीकडे ते आणि सरिता आवाड यांनी विचारवेधच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेऊन वैचारिक घुसळण घडवून आणली आहे. समाजवाद, लोकशाही समाजवाद, मार्क्सवाद, विज्ञाननिष्ठ मानवतावाद असे बहुआयामी त्यांचे व्यक्तिमत्व होते, आदी भावना मनोगतातून कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या संयोजनात विशाल विमल, सुदर्शन चखाले, सुदर्शन शिंदे, प्रशांत कांबळे, अनिकेत माळी, अभिजित आंब्रे, भक्ती कांबळे, अनिकेत साळवे, त्रिवेणी गव्हाणे, प्रथमेश, भूषण भुजबळ आदी सक्रीय होते. प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.