सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
  • ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
  • बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 जिल्हा

मुरगूड नगरपरिषद निवडणूक २०२५ : बदलत्या समीकरणांचा राजकीय पट

अजिंक्य स्वामी    24-11-2025 17:56:35

मुरगूड (जि. कोल्हापूर): मुरगूड नगरपरिषद निवडणूक २०२५ हे वर्ष स्थानिक राजकारणातील नवी समीकरणे, नव्या आघाड्या आणि गटबाजीतील मोठे बदल घेऊन येत आहे. दीर्घकाळापासून स्वतंत्रपणे ताकद दाखवत असलेल्या विविध गटांनी आता आगामी निवडणुकीत भविष्याचे गणित लक्षात घेऊन नवे राजकीय मार्ग निवडले आहेत. विविध गटांची नवीन आघाडी, काही नेत्यांचे पक्षांतर, तसेच अपक्ष बंडखोर उमेदवारांमुळे मुरगूडमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. तसेच मुरगूड नगरपरिषदचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले-महिला असे पडल्यामुळे वर्षाखेरीस पुन्हा एकदा एका महिलेच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार आहे.

मुश्रीफ–घाटगे गटाची एकत्र वाटचाल

परंपरेने स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या मुश्रीफ व घाटगे गटांनी यावेळी एकत्र येत शक्ती एकवटण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने राज्यात प्रथमच अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढत आहेत. या आघाडीला आणखी बळकटी देत गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील व मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या गटाचा सहभागही मिळाला आहे. त्याच बरोबर समरजितसिंह घाटगे यांच्या गटालादेखील मुरगूडमध्ये मुश्रीफ-पाटील-जमादार यांच्या सहकार्याचा फायदा होणार आहे.

• या सर्वांचा एकत्रित आधारभूत मतदारसंघ मजबूत असून त्यातून एक प्रभावी सत्तांतराचा प्रयत्न दिसून येतो.

• या गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी सौ. तस्मिन जमादार यांना संधी देण्यात आली आहे.

• या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर दोन्ही राष्ट्रवादीची ताकद वाढली असून निवडणूकी मध्ये थेट दोन शक्तींचा सामना होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रवीणसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि संजय मंडलिक यांच्याशी पक्षीय पातळीवर युती – समीकरणे बदलणारा निर्णय

दुसरीकडे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांचा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश हा निवडणुकीतील मोठ्या घडामोडींपैकी एक ठरला आहे.

• त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक पातळीवर एक मजबूत नेतृत्व मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

• विशेष म्हणजे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे  प्रवीणसिंह पाटील यांची भाजपच्या माध्यमातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाशी युती जुळली आहे.

• विशेष बाब म्हणजे प्रवीणसिंह पाटील यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी युती मध्ये मुरगूडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षाची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे आपल्या पत्नी सौ. सुहासिनीदेवी पाटील यांना शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवून दिली आहे.   

• या आघाडीमुळे विरोधकांसाठी निवडणूक अधिक कडवी आणि रणनीतीपूर्ण होणार हे निश्चित.

या दोन्ही आघाड्यांचा विचार केला असता:

1. रणजितसिंह पाटील,  राजेखान जमादार व घाटगे गट (मुश्रीफ-घाटगे गट) हे पारंपरिक ग्रामीण मतदार, समाजघटक व संस्थात्मक पाठबळावर आधारित आहेत.

2. प्रवीणसिंह पाटील व संजय मंडलिक (भाजप– शिवसेना) युती हे विकासाभिमुख, केंद्र–राज्य सरकारच्या योजनांचा आधार घेत प्रचार करण्याच्या तयारीत आहेत.

अपक्ष बंडखोरांचे आव्हान – तिरंगी लढतीची तयारी

या दोन्ही बलाढ्य आघाड्यांमध्ये लढत असतानाच, काही प्रभागांमध्ये अपक्ष बंडखोर उमेदवारांनी देखील मैदानात उडी घेतली आहे.

• संबंधित नेत्यांनी त्यांना पक्षांतर्गत राहून माघार घेण्याची विनंती केली असतानाही, अनेकांनी सूचना धुडकावून उमेदवारी कायम ठेवली आहे.

• यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

• मुरगूडमध्ये अपक्षांना भलेही मोठ्या प्रमाणावर विजय मिळण्याची शक्यता कमी असली, तरीही त्यांनी घेतलेली मते दोन्ही मुख्य आघाड्यांच्या निकालावर निर्णायक परिणाम करू शकतात.

• विशेषतः ज्या ठिकाणी दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये काटेकोर लढत आहे, तेथे अपक्षांची मते “किंगमेकर” ठरू शकतात.

मुरगूडमधील राजकारण या निवडणुकीत पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसत आहे. नव्या आघाड्या, नवे पक्षांतरे आणि अपक्षांचा प्रभाव. मतांचे सूक्ष्म विभाजन, गटांचे गणित आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव या सगळ्यांवर अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. आगामी दिवसांमध्ये प्रचाराचा जोर वाढेल तसे वातावरण आणखी रंगतदार होणार हे निश्चित. या राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट होते की मुरगूडमधील सत्ता कोणाच्या हातात जाणार हे ठरवताना मतदारांचे प्राधान्य, स्थानिक मुद्दे आणि नेतृत्वावरील विश्वास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती