पुणे : एका शालेय विद्यार्थिनीला भरकटण्यापासून वाचवून तिला तिच्या आईकडे सुखरूप पोहोचवल्याची घटना समोर आली आहे. हा अत्यंत हृदयस्पर्शी आणि कौतुकास्पद प्रसंग शेवाळवाडी ते पिंपळे गुरव मार्गावरील पीएमपी बस प्रवासादरम्यान घडला. पीएमपीच्या महिला कंडक्टर स्वप्ना दराडे यांच्या सतर्कतेमुळे हे शक्य झालं.
सोमवारी सकाळी 7.25 वाजता 148 क्रमांकाची बस हडपसर गाडीतळ येथून पुढे जात असताना विद्यार्थिनीने वैद्यूवाडीचे तिकीट घेतले. मात्र वैद्यूवाडी व भैरोबा नाला हे थांबे गेल्यानंतरही ती न उतरल्याने कंडक्टर दराडे यांना संशय आला. विचारणा केली असता मुलीने “वडील बसमध्येच आहेत, मी शेवटच्या थांब्यावर उतरेन” असे सांगितले; परंतु बसमध्ये तिचे वडील कुठेच दिसत नव्हते.ही गोष्ट अनुभवी कंडक्टर स्वप्ना दराडे यांच्या लगेच लक्षात आली.यामुळे दराडे यांना संशय आला की, काहीतरी गडबड आहे. शेवाळवाडी ते पिंपळे गुरव मार्गावर पीएमपी बस प्रवासादरम्यान एका सहावीतील विद्यार्थिनीला भरकटण्यापासून वाचवण्याची घटना घडली. महिला कंडक्टर स्वप्ना दराडे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे ही चिमुकली सुरक्षितपणे तिच्या आईकडे पोहोचली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दराडे यांनी चालक व प्रवाशांच्या मदतीने बस पुलगेट स्थानकावर थांबवली. त्यांनी वाहतूक निरीक्षकांना माहिती दिली व मुलीची विचारपूस केली. घाबरलेली मुलगी काही सांगू शकत नसली तरी तिच्या शाळेच्या गणवेशावरील बॅजवरून ‘आदर्श विद्या मंदिर, हडपसर’ शाळेची माहिती मिळाली.
कंडक्टर दराडे यांनी तातडीने शाळेशी संपर्क साधला. वर्गशिक्षकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीच्या आईला तसेच खबरदारी म्हणून पोलिसांनाही कळवण्यात आले. काही वेळातच मुलीची आई पुलगेट स्थानकावर पोहोचली व कंडक्टर दराडे यांनी विद्यार्थिनीला तिच्या स्वाधीन केले.कंडक्टर स्वप्ना दराडे यांच्या सामाजिक भानामुळे आणि योग्य वेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे एका चिमुकलीचे मोठे नुकसान टळले. प्रवासी व पीएमपी प्रशासनाकडून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.