पुणे : संविधान दिन आणि साथी अभय जोशी स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधी ' अंतर्गत शिष्यवृत्ती चे वितरण राजमाता जिजाऊ मासाहेब सभागृह, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी येथे झाले.धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि जतन फाउंडेशन फॉर इंक्लूजन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले .कार्यक्रमास अभ्यासक डॉ. प्रदीप आवटे,सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष व संविधान अभ्यासक सुभाष वारे, विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधीच्या प्रवर्तक ज्योती जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपान ऊर्फ काका चव्हाण (अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान) होते.
महाराष्ट्र आरोग्य मंडळ नरसिंग कॉलेजच्या ५, सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या ४ व धायरेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या ६ विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वितरण उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त मधू पाटील, सहसचिव उपेंद्र टण्णू, अनिकेत चव्हाण, प्राचार्या सुजाता कडू, प्राचार्या सुचेता देखणे, प्राचार्या अश्विनी पालवणकर व राहुल भोसले उपस्थित होते.कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.प्रमोद वागदरीकर, डॉ.पंकज गांधी, माधुरी आवटे, किरण पाटील, संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाची रूपरेषा जतन फाउंडेशनच्या अर्चना झेंडे यांनी मांडली. अनिकेत सोपान (काका) चव्हाण (संचालक, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान) यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडताना संविधानाचा विचार करताना फक्त आपल्या अधिकाराचा विचार न करता आपल्या कर्तव्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मांडले.पाहुण्यांचा परिचय जतन फाउंडेशनच्या रवींद्र झेंडे यांनी करून दिला.
साथी सुभाष वारे वारे यांनी विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधीची व अभय जोशी यांच्या योगदानाची माहिती दिली. संविधाना विषयी बोलताना त्यांनी युवा पिढीला संविधान अमलात आल्यानंतरची स्थिती व संविधान लागू होण्या आधीची स्थिती याचे दाखले देत संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारामुळे झालेल्या परिणामकारक बदलाची मांडणी केली. डॉ. प्रदीप आवटे यांनी आपली मांडणी करताना निरोगी आयुष्याची व निरोगी समाजाची संकल्पना स्पष्ट केली. शारीरिक निरोगीपणा सोबतच मानसिक निरोगीपण कसे महत्वाचे आहे या विषयी त्यांनी सविस्तर मांडणी केली.या नंतर मागील वर्षी विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधी प्राप्त झालेल्या अमिना कन्नी, यास्मिन शेख व निशा भिलावेकर या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. या शिष्यवृत्ती वितरणाचे संचालन एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सहसचिव उपेंद्र टण्णू यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात सोपान ऊर्फ काका चव्हाण यांनी शिक्षणासाठी मुलींना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे महत्व विषद करताना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सहाय्याचा योग्य तो वापर करून आपले शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करतील व त्याची जाण ठेवतील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात सुरुवातीला धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या २५ वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी व धायरेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगची माहिती देणाऱ्या शॉर्ट फिल्म दाखवण्यात आल्या. जतन फाउंडेशन फॉर इंक्लूजनच्या कामाची माहिती रवींद्र झेंडे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली.