मुंबई : “महाराष्ट्रातील विद्यापीठांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा. राज्यातील विद्यापीठे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत”,असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावणे आणि राज्यस्तरीय एसआयआरएफ पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली.
राज्यातील विद्यापीठांनी एनआयआरएफ तसेच जागतिक रँकिंगमध्ये उंच भरारी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवणे, दर्जेदार शिक्षण देणे, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी संशोधन प्रकाशित करणे, तसेच नॅक (एनएएसी) मानांकन सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित व संबंधित अधिकारी उपस्थित होते.