मुंबई : हवामान विभागाने मुंबई शहर जिल्ह्यातील मच्छिमारांना पुढील पाच दिवसांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप, मालदीव लगतचा समुद्रप्रदेश, कोमोरिन परिसर आणि मन्नारचा आखात येथे 35 ते 45 किमी प्रतितास ते 55 किमी प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो.26 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत या समुद्रक्षेत्रात परिस्थिती प्रतिकूल राहण्याचा अंदाज असल्याने मच्छिमारांनी या भागात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.सतत बदलत्या हवामान परिस्थितीची दखल घेत मच्छिमारांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.