उरण : काही दिवसांपूर्वी जेव्हा आपल्या उरणची कन्या यशश्री शिंदे हिचा मृत्यू झाला, तेव्हा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उरणमध्ये येऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला टार्गेट केले होते. त्या वेळेस आपल्या उरणचे आमदार एक शब्दानेही काही बोलले नाहीत, ना त्यांनी उरणमधील सर्व मुस्लिम बांधवांच्या बाजूने कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली. आता जेव्हा निवडणूक तोंडावर आली असताना, मुस्लिम बांधवांच्या मतांसाठी त्यांनी उर्दूमध्ये पत्रके छापून सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना 'दावतचे' निमंत्रण दिले आहे अशी टीका उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी आमदार महेश बालदींवर केली आहे.
उरण येथील मस्जिद मोहल्ला परिसरात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार सभा उत्साहात पार पडली. या सभेला ठाण्याहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवा नेत्या मर्झिया पठाण उपस्थित होत्या. त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वीडियो कॉलिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
या सभेत मर्झिया पठाण यांनी उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक ५ मधील रहिवाशांना एकतेची ताकद काय असते हे सांगितले आणि सर्व धर्म समभावाचा संदेश, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तसेच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा धर्म आहे.
यावेळी भावना घाणेकर म्हणाल्या की, मुस्लिम बांधवांनी हे विसरू नये की भाजप संपूर्ण देशात "बटेंगे तो कटेंगे" म्हणत समाजात विभागणी करत आली आहे. आपल्याला उरणमध्ये "जुडेंगे तो बढेंगे" हेच आपले ध्येय मानून एक दिलाने, एकत्रित रित्या या उरणचा विकास करायचा आहे.