नागपूर : स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य आमचे गुरु तथागत गौतम बुध्द यांच्या शिकवणीतून आपल्याला मिळाले. भारतीय राज्य घटनेत घेतलेले हे मूल्य गौतम बुध्द यांच्या विचारातील असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत. हेच मूल्य संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय पालिका अशा अत्यंत प्रभावी व परिणामकारक शक्तीस्थळाची देणगी डॉ. बाबासाहेबांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त मंगेश वानखेडे, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्ट आपले शिक्षण घेतले. विदेशात त्यांना विदेशात विविध संधी असूनही आपल्या मातृभूमीबद्दल असलेली कटिबध्दता त्यांनी जपत मायभूमीला प्राधान्य दिले. आय एम इंडियन फस्ट, इंडियन लास्ट, हे तत्व त्यांनी शेवटपर्यंत जपले. अनेक भाषा, जात, धर्म, पंथ आदिंमध्ये असलेल्या भारताच्या एकसंघत्वाचा पोत सांभाळून या विविधतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका सूत्रात संविधानाच्या माध्यमातून बांधले. आपल्या संविधानात कोणत्याही जात, धर्म, पंथांचा अनादर नाही असे डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.
राज्य घटनेत असलेले प्रत्येक मूल्य आपण नागरिक म्हणून सर्वांनी उद्देशिकेमध्ये सांगितल्या प्रमाणे स्वत:प्रत अर्पण केलेले आहे. याचाच अर्थ आपल्या प्रत्येकाच्या वर्तनात भारतीय राज्य घटनेने दिलेल्या मूल्यांची जपणूक करण्यासमवेत कोणत्याही परिस्थितीत याची दक्षता व जपणूक करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे, असे त्यांनी सांगितले.
संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखी अमूल्य देणगी मिळाली आहे. या स्वातंत्र्यातील मूल्य टिकविणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. इतरांच्या अधिकाराचे हनन होणार नाही याचे भान राज्य घटनेने प्रत्येकाला दिलेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले. घर घर संविधान उपक्रमांतर्गत 20 हजार नागरिकांपर्यंत संविधान उद्देशिका पोहचविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक हूकुमचंद मिश्रीकोटकर, काशिनाथ धांडे, गौरव आळणे, नयना झाडे, पुंडलिक बोर्डे आदींना भारतीय राज्य घटनेची उद्देशिका प्रातिनिधीक स्वरुपात भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अवनी वेखंडे-सूतवणे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयापासून निघालेल्या रॅलीचा समारोप संविधान चौक येथे करण्यात आला.