मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील फुटबॉलमधील प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी “महादेवा फुटबॉल उपक्रम” अंतर्गत निवड झालेल्या ६० मुला-मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा),वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफए) आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, फिटनेस मॉड्यूल तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य संधी, सक्षम मार्गदर्शन आणि दर्जेदार सुविधा देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांनी सांगितले.