नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंह यांच्यासह महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज सकाळी गोदावरी नदीच्या काठावरील घाटांची पाहणी करून विविध सूचना केल्या.
आयुक्त श्री. सिंह यांनी रामकुंड परिसर, गांधी तलाव, पांडे मिठाई पूल, बालाजी कोठ, गणेशवाडी पूल, रामसेतू पूल, गाडगे महाराज पुलासह अमरधामपर्यंतच्या घाटाची पाहणी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांसह देश- विदेशातून भाविक येणार आहेत. त्यांच्या अमृत स्नानासाठी घाट सुरक्षित करावेत. त्यासाठी घाटांची दुरुस्ती करून आवश्यक तेथे कठडे बसवावेत. घाटांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करीत पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करावे.
भाविकांचे स्नान, वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, घाटांची क्षमता, पाण्याची खोली, विद्युतीकरण, आपत्कालिन मार्गांची पाहणी करावी. या सर्व सुविधा अद्ययावत कराव्यात, तसेच भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करावे, अशाही सूचना आयुक्त श्री. सिंह यांनी दिल्या. आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती दिली, तर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी घाटांचे बांधकाम, दुरुस्ती याच्या नियोजनाची माहिती दिली.