मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेने घेतलेल्या ‘नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता’ या सेवा पर्वातील चित्रकला स्पर्धा ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त सहकार्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी (१७ सप्टेंबर २०२५) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर २०२५) आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत ‘नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता’ या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा आज पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी मंत्री शेलार बोलत होते.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त प्राची जांभेकर, कला अकादमीच्या संचालिका मिनल जोगळेकर, गुरुचरणसिंह सिंधु निर्मिती प्रतिष्ठानच्या सुजात खरे, तसेच विविध शिक्षणाधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना मंत्री आशीष शेलार म्हणाले, “मुलांनी आत्मविश्वासाने सादर केलेले कार्यक्रम पाहून आनंद झाला. पुढील पिढी अशीच पुढे गेली तर भारत विश्वगुरू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पर्व साजरा करण्याचा निर्णय घेतला असून लोकसहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
१४ कोटी कागदपत्रांचे डिजिटायजेशन, ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन, हेरिटेज वास्तूंची पुस्तके, राज्यातील ७५ वाद्यांचे प्रदर्शन हे उपक्रम म्हणजे सांस्कृतिक संवर्धनाची नवी दिशा आहे.”ते पुढे म्हणाले, “लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सेवापर्वातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. चित्रकला स्पर्धेने इतिहास घडवला. मुलांमधील कला गुण शोधून त्यांना वाव देणे ही खरी लोकशाही आहे.”छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करीत मंत्री शेलार म्हणाले की, “भारताचा सांस्कृतिक वारसा भव्य आणि अद्वितीय आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या वारशाचे विशेषत्व जपण्याचे आणि जगासमोर मांडण्याचे काम केले. अशा स्पर्धांमधून आदर्श व्यक्तिमत्त्वे घडणार आहेत.”
४०० शाळांमधील तब्बल ७५ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला, तर ८० परीक्षकांनी दोन दिवस परिक्षणाचे काम पार पाडले. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे, शाळा आणि कला शिक्षकांची नावे समारंभात जाहीर करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे कौतुक करतानाच उपस्थित सर्व मान्यवरांनी भविष्यातील अशा स्पर्धांना आणखी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मिनल जोगळेकर यांनी केले.