मुंबई : माध्यमांशी संवाद साधण्यासाठी काळानुरूप नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विविध डिजिटल अॅप्स, ‘टेक्स्ट-टू-व्हिडिओ’ प्लॅटफॉर्म, चॅट जीपीटीसारखी साधने वापरून प्रसिद्धी साहित्य तयार केल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही वाढू शकते, असे ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांनी सांगितले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस बोलत होते. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सम्राट फडणीस म्हणाले, आज अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये डिजिटल अँकर्सचा वापर वाढला असून त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होते, अचूकता वाढते आणि वेळेची बचत होते. सोशल मीडियावर वाढत्या प्रमाणात दिशाभूल करणारी माहिती पसरत असल्याने पुढील दहा वर्षांत फॅक्ट-चेकिंगची गरज आणखी वाढेल, यासाठी आधुनिक विश्लेषण प्रणाली, डिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञान यांचा विभागाने सक्षमपणे वापर करणे गरजेचे आहे.
स्वतंत्र ॲप आणि स्वतःचा डेटा-बेस आवश्यक
माहिती व जनसंपर्क विभागाने आपले स्वतंत्र आधुनिक ॲप विकसित करून त्याद्वारे शासकीय माहिती, प्रसिद्धिपत्रके, धोरणात्मक घोषणा आणि जनजागृती मोहीमा थेट जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. स्वतःचा डेटा-बेस तयार केला तर माहिती अधिक जलद व अचूक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल, असेही फडणीस यांनी नमूद केले.
क्रिएटिव्हिटी, प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रभावी कंटेंट यांचे महत्त्व
जनतेपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती प्रभावी, आकर्षक आणि क्रिएटिव्ह असणे अत्यावश्यक आहे. मनोरंजनाच्या स्वरूपात दिली जाणारी माहिती अधिक लक्षवेधी ठरते, त्यामुळे विभागाने माहिती सादरीकरणाचा आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाची प्रॉडक्टिव्हिटी चारपट वाढणार असून, डिजिटल साधनांचा वापर हे यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही फडणीस यांनी सांगितले.
राज्यांच्या गुंतवणुकीचे उदाहरण
केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यांनी शासकीय माध्यमात मोठी गुंतवणूक करून पर्यटन, उद्योग व शासन व्यवस्था यांची प्रभावी प्रसिद्धी केली आहे. महाराष्ट्र हे मूलतः विकसित राज्य असल्याने पर्यटन, उद्योग, संस्कृती आणि शासन प्रगती यांची देशातील इतर राज्यात प्रभावी प्रसिद्धी करण्यावर भर द्यावा, असेही फडणीस यांनी यावेळी सांगितले.
माहिती व जनसंपर्क विभाग – शासनाचा खरा दुवा
शासनाचे लोकराज्य मासिक अतिशय माहितीपूर्ण आणि संग्रही आहे. डिजीटल स्वरुपातही माहिती जनतेला मिळेल यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. शासकीय माहिती जनतेपर्यंत पोहोचवणारा खरा वाहक म्हणून विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी. सत्यता विश्वसनीयता, पारदर्शकता आणि गतीमानता ही जनसंपर्क विभागाची ओळख बनली पाहिजे, असे फडणीस यांनी सांगितले.यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विविध विषायावर फडणीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी यांनी फडणीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे यांनी सूत्रसंचलन केले तर वरिष्ठ सहायक संचालक काशीबाई थोरात यांनी आभार मानले.