नवी मुंबई :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी खारघर, नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास जिल्ह्यातील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजातील प्रतिनिधींनी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ‘आरम्भता की अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आली.
नवी मुंबई, खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या शहिदी समागम शताब्दी या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ करुन करण्यात आली. यावेळी क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कौन्सिल, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ), उपस्थित होते. सिंग समाजाचे अध्यक्ष लड् राम नागवाणी, निमंत्रक तथा राज्यस्तरीय समिती तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे मिंलकित सिंग बल, उपजिल्हाधिकारी रायगड रविंद्र राठोडही उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी खारघर, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमाचा आयोजनाची संधी आपल्याला मिळाली आहे. या कार्यक्रमाला शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव परंपरा आणि सिंधी समाजातील प्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. प्रशासनाच्या समन्वयाने कार्यक्रम नियोजनबद्धपणे पार पडेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रध्देचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून बंधुत्वाचा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.यावेळी बलकित सिंग म्हणाले की, युवा पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांचे कार्य पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर, नवी मुंबई येथील खारघर येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांच्या समन्वयाने कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.