पुणे : गेल्या काही दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या वेळापत्रकात मोठा गोंधळ निर्माण झाला असून देशभरातील प्रवासी हैराण झाले आहेत. पुणे विमानतळावर आजही इंडिगोची तब्बल 42 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान रद्द होणे, वेळापत्रकात सतत बदल आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत आहे.अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या मागील काही दिवसांपासून विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा देशभरातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम दिसून येत आहे. पुणे, मुंबई, नागपूरसह अनेक प्रमुख विमानतळांवर प्रवासी अक्षरशः अडकून पडले आहेत. हजारो प्रवाशांचे प्रवास बिघडले असून तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यात इंडिगोची 42 उड्डाणे रद्द
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. आज (शनिवार) इंडिगोची 42 उड्डाणे रद्द करण्यात आली. मागील काही दिवसांपासून वेळापत्रक सतत बदलत असल्याने प्रवाशांचा गोंधळ वाढला आहे. दिल्ली, चेन्नई, नागपूर, कोची, बंगळुरू व महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या उड्डाणांना सर्वाधिक फटका बसला आहे.
तिकीट दरांचा भडका
इंडिगोच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याचा फटका इतर विमान कंपन्यांनी तिकिटांच्या दरात वाढ करून प्रवाशांना बसवला आहे.
पुणे–मुंबई विमानभाडे तब्बल 1 लाख रुपये
मुंबई–नागपूर 39 हजार रुपये
नागपूर–पुणे, मुंबई–नागपूर इत्यादी मार्गांवर 30 हजारांहून अधिक भाडे
वाढलेली मागणी आणि उड्डाणांची कमतरता यामुळे विविध एअरलाईन्सने नुसत्या तासाभराच्या अंतरातील प्रवासाचे दरदेखील प्रचंड वाढवले आहेत.
देशभरातील परिस्थिती गंभीर
इंडिगोने गेल्या चार दिवसांमध्ये 1000 हून अधिक उड्डाणे रद्द केली असून प्रसंगी एकाच दिवशी देशभरातील 500 उड्डाणे रद्द झाल्याची नोंद आहे. दिल्ली विमानतळावर तर 5 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली होती.यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले असून अनेकांना रात्रीभर विमानतळावरच थांबावे लागले.
व्हीआयपी प्रवाशांचादेखील त्रास
मुंबई–नागपूर इंडिगो उड्डाण अचानक रद्द झाल्याने अनेक व्हीआयपी प्रवाशांना मुंबई विमानतळावर रात्र काढावी लागली. वाढलेल्या तिकीट दरांमुळे सामान्य प्रवासी आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडले आहेत.गुरुवारी रात्री मुंबई–नागपूर इंडिगो उड्डाण रद्द झाल्याने अनेक व्हीआयपी प्रवाशांना रात्रीभर मुंबई विमानतळावर थांबावे लागले. भाड्यांच्या अचानक झालेल्या वाढीमुळे सामान्य प्रवाशांनाही आर्थिक फटका बसला आहे.
नवविवाहित जोडप्याला रिसेप्शन ‘ऑनलाईन’
इंडिगोच्या गोंधळाचा अनोखा फटका कर्नाटकातील हुबळीच्या नवविवाहित जोडप्याला बसला. हुबळीची मेधा क्षीरसागर आणि ओडिशाच्या भुवनेश्वरचा संगम दास दोघेही बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी झाले. वधूच्या गावी हुबळी येथे 4 डिसेंबरला रिसेप्शन आयोजित होते. त्यांनी 3 डिसेंबरची विमान तिकिटे बुक केली होती; परंतु इंडिगोची सेवा कोलमडल्याने ते दोघेही हुबळीला जाऊ शकले नाहीत. परिणामी त्यांना स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाइन उपस्थित राहण्याची वेळ आली.
अनेक शहरांत उड्डाणांची मोठी घसरण
पुणे : 42 उड्डाणे रद्द
श्रीनगर : 18 उड्डाणे रद्द
वाराणसी : 22 उड्डाणे रद्द
चंदिगड : 10 उड्डाणे रद्द
अहमदाबाद : 19 उड्डाणे रद्द
इंडिगोच्या संचालनातील तांत्रिक त्रुटी, वैमानिकांची कमतरता आणि चेक-इन प्रणालीतील अडचणी यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रवासी मात्र या गोंधळाचा मोठा बळी ठरत आहेत.इंडिगोची विस्कळीत सेवा, वैमानिकांची कमतरता, तांत्रिक अडचणी व संचालनातील त्रुटींमुळे देशभरातील विमान वाहतूक अस्ताव्यस्त झाली आहे. प्रवाशांना उड्डाणांबाबत सतत अपडेट तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.