कोल्हापूर : ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून, जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित ‘पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन’ कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, दुग्धव्यवसायिकांना गतीने प्रगती करण्यासाठी अशा तांत्रिक कार्यशाळांमधून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रमातून जिल्ह्यात १०० टक्के अनुदानावर २० हजार पशुपालकांना मका, ज्वारी आणि बरसिम यांसारख्या वैरणीचे बियाणे मोफत दिले जात आहे. या योजनेसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेत कागदपत्रांची पूर्तता करून हे बियाणे उपलब्ध होईल. या बियाणे वाटपामुळे पशुंना सकस चारा आणि मुरघासासाठी मदत होणार आहे. भविष्यातील दुग्धव्यवसाय वाढीसाठी कष्टाळू शेतकऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बियाणे वाटप करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
याच कार्यक्रमात केंद्र शासनाचा मानाचा ‘राष्ट्रीय गोपाळरत्न’ पुरस्कार (प्रथम क्रमांक) मिळवल्याबद्दल चिखली (ता. कागल) येथील अरविंद यशवंत पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजळ, सहायक आयुक्त डॉ. प्रमोद बाबर यांच्यासह जिल्हाभरातील दुग्धव्यवसायिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांत्रिक मार्गदर्शन सत्रात विविध तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दयावर्धन कामत यांनी जनावरांच्या आजारपणात ‘इथनो व्हेटर्नरी’ औषधांचा वापर, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण भट यांनी चारा पिकांचे लागवड तंत्र व पोषणमूल्य, सहायक आयुक्त डॉ. सॅम लुद्रीक यांनी पशुआरोग्यात सकस चाऱ्याचे महत्त्व, टीएमआर (TMR) तंत्र व वंध्यत्व निवारण, तर डॉ. वैभव खराडे यांनी आधुनिक चारा लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त डॉ. प्रमोद बाबर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रसाद भामरे यांनी केले.