सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
  • तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
 विश्लेषण

अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – सभापती प्रा. राम शिंदे

डिजिटल पुणे    08-12-2025 11:54:38

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक विभागप्रमुखाने तत्पर राहून सर्वत्र सुव्यवस्था राखावी, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केल्या.विधान भवनाच्या मंत्री परिषद सभागृहात प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव 1), मेघना तळेकर (सचिव-2), डॉ. विलास आठवले (सचिव-3) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-4) यांच्यासह विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीमध्ये मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था, पुरविण्यात आलेली इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षा, आरोग्य आदी सुविधांबाबत यावेळी सविस्तर माहिती घेण्यात आली. रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमध्ये देण्यात आलेल्या वायफाय व इंटरनेट व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. महिला आमदारांची निवास व्यवस्था, राजकीय पक्षांच्या प्रतोदांना कार्यालये उपलब्ध करून देणे आणि या सर्व ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा, लिफ्ट, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छता आदिंविषयी निर्देशही देण्यात आले.

मंत्री, विधिमंडळ सदस्यांची निवासस्थाने, विधानभवन येथील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेबाबत व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या तयारी बाबत पोलीस विभागाकडून माहिती देण्यात आली. महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि ॲम्ब्युलन्स आदींबाबत मनपाकडून माहिती देण्यात आली. विधानभवन, रविभवन, नागभवन, हैद्राबाद हाऊस, आमदार निवास, सुयोग पत्रकार निवास येथे उभारण्यात आलेले वैद्यकीय कक्ष आणि विधानभवन येथे हिरकणी कक्ष आणि अन्न परीक्षणासाठी नेमण्यात आलेल्या चमुंची माहितीही संबंधित यंत्रणांनी दिली.

हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातून येणाऱ्या विधिमंडळ सदस्यांना विमान व रेल्वे प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. या संदर्भात सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अधिवेशन संपल्यावर अधिकाऱ्यांना पुन्हा आपल्या गंतव्यस्थळी जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाडी सोडण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आली व ही मागणी रेल्वे विभागाकडून मान्यही करण्यात आली.

विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर होणारी गर्दी व वाहनांचे नियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरक्षेला प्राधान्य देत व गर्दी टाळण्यासाठी विना प्रवेशपत्र विधानमंडळात आगंतुकांचा प्रवेश नियंत्रित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त अविनाश हदगल यांनी सादरीकरण केले.बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.


 Give Feedback



 जाहिराती