मुंबई: राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीदरम्यान आज महत्त्वपूर्ण करार होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईत दाखल होत आहेत. या करारामुळे मुंबईसाठी मोठी घोषणा होऊ शकते, असे विश्वासार्ह सूत्रांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून, या कराराचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेऊन २०२६ पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारले जाईल. त्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा आणि आवश्यक जागेची निश्चिती करावी.
मुख्यमंत्री यांनी बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, वाढवण बंदर ते नाशिकपर्यंत महामार्ग निर्माण करावा, यासाठी राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असावा, असेही त्यांनी सांगितले.
बंदर परिसरात औद्योगिक विकासासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व बंदर विभाग यांच्या समन्वयातून कंपनी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्माणाधीन वाढवण बंदरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सर्व बोटी पूर्णपणे इलेक्ट्रिक असाव्यात, सुरुवातीला हायब्रीड मॉडेल वापरता येईल, तसेच कोचीपेक्षा मोठा प्रकल्प पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रस्तावित प्रकल्पांतर्गत २१ टर्मिनल्स आणि २०० नॉटिकल माइल मार्ग तयार होतील. यावेळी मंत्री नितेश राणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.