नागपूर : उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी 1200 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले.शहरातील सेंटर पाईंट हॉटेल येथे सामाजिक न्याय विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संवाद – देशाच्या भविष्याशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे ते प्रगती करू शकतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. या योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी लागणारे साहित्य तसेच सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा करण्यात येईल.
वसतिगृहात वातावरण निर्मितीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येईल. त्यासोबतच वसतिगृहात नवीन 25 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नवी योजना आणण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थी घडविणे सामाजिक न्याय विभागाचे काम असून केंद्रस्थानी विद्यार्थी राहील यावर विभागाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. स्वप्न पहा, स्वत:ला सक्षम करा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका, स्वत:च्या प्रगतीवर भर द्या. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रगती निश्चित आहे. समाजाला सक्षम करणे महत्वाचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.यावेळी मंत्री श्री. शिरसाट यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा तसेच इतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक आयुक्त सुकेशीनी तेलगोटे यांनी आभार मानले.