नागपूर : वंदे मातरम् हे गीत भारताच्या क्रांतीचा मंत्र होता. याला 150 वर्षे पूर्ण होत असताना अशा प्रकाराच्या देशातील पहिल्या वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण होत आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब असून नागपूर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच संस्कृतीच्या संवर्धनालाही सर्वोच्च प्राधान्य आहे, या उद्यानात लेझर शोसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बजोरिया भागातील एम्प्रेस मिलच्या जागेवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, माजी आमदार विकास कुंभारे, अनिल सोले, गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव रामास्वामी एन., महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, वैष्णवी बी. आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
वंदे मातरम् या संकल्पनेवर आधारित उद्यानामध्ये भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याच्या माहिती सोबतच 21 परमवीर चक्र मिळालेल्या विरांचे पुतळे व त्यांच्या शौर्याची गाथा जनतेपर्यंत पोहचणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे उद्यान प्रेरणा उद्यानामध्ये रुपांतरित झाले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या उद्यानाच्या माध्यमातून देशसेवेची व राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत होणार आहे. या उद्यानातील अत्याधुनिक अशा प्रोजेक्शन मॅपिंग टेक्नालॉजीच्या माध्यमातून लेझर शो सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
‘विकास भी और विरासत भी’ या संकल्पनेनुसार नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, जेथे सैनिकांचा सन्मान होतो, अशा नागपूर शहरातील क्रांतीच्या इतिहासातील हिंदुस्थानी लाल सेनेचा इतिहास सर्वांसमोर यावा व यामाध्यमातून प्रेरणा मिळावी, यासाठी वंदे मातरम उद्यान सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना भारत एक जगातील महाशक्ती होण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी देशाच्या सीमा देखील सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भारतीय सेना समर्थपणे पार पाडत आहेत. अंदमान निकोबार येथील 24 द्विपांना परमवीर चक्र प्राप्त विरांची नावे तसेच सुभाषचंद्र बोस यांचे देखील नाव दिले आहे.
अत्याधुनिक मासळी बाजाराचे भूमिपूजन
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत नागपूर महानगर पालिकेच्या संयुक्तपणे भांडेवाडी येथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या प्रकल्पासाठी 21 कोटी रुपये खर्च येणार असून राज्यातील दर्जेदार व सर्व सुविधा असलेला महत्त्वाचा प्रकल्प साकारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या भांडेवाडी येथील प्रकल्पाची माहिती दिली.प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण केले. तसेच येथील देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलीदान देणाऱ्या 21 परमवीर चक्र विजेत्यांचा पुतळ्यास अभिवादन करुन संपूर्ण उद्यानाची पाहणी केली.
यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी वंदे मातरम्उद्यानाच्या निर्मितीची संकल्पना सांगितली. महानगरपालिकेने सुमारे वीस हजार चौरस मीटर जागेत या उद्यानाची निर्मिती केली असून इंडिया गेटच्या धर्तीवर प्रतीकात्मक प्रवेशव्दाराची प्रतिकृती अमर जवान ज्योती नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्रता लढ्यात शहीद झालेल्या हुतात्मांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुला रंगमंच तयार करण्यात आला आहे.महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वागत केले व वंदे मातरम् उद्यानाच्या निर्मितीसंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन मनीष सोनी यांनी केले.