नागपूर : मनोर (जि. पालघर) येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने गर्भवती मातेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चौकशी करण्यात आली असून चौकशीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले.सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले, मनोर (जि. पालघर) ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केलेल्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या तेथील स्त्री रोग तज्ज्ञ यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्याही सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. तसेच येथील प्रभारी सर्जन यांची बदली करण्यात आली असून त्यांनी विभागीय चौकशी करण्यात येत आहे.
आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घेतली आहे. आदिवासी बहुल, डोंगरी, ग्रामीण भागातील रुग्णालयामधील डॉक्टरांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी विभागामार्फत पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच या दुर्दैवी घटनेतील कुटुंबास चौकशीअंती आवश्यक मदत दिली जाईल, असेही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.