पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा नारा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हालचाल सुरू झाली. भाजपला रोखण्यासाठी पवार काका–पुतण्या एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. याला काही तास उलटले न उलटले, पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं. शहरातील अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली. यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा नाना काटे यांनी केला.
शहरातील अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादी गटांची ही पहिलीच संयुक्त चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.या बैठकीबाबत माहिती देताना नाना काटे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचा मला फोन आला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन होऊ नये आणि स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.”
नाना काटे आणि सुनील गव्हाणे यांनी स्पष्ट केले की, ही बैठक अजित पवार, सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच घेण्यात आली.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
या बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे—
शरद पवार गटाने ‘तुतारी’ चिन्हावर उमेदवार द्यायचे की नाही
निवडणूक फक्त ‘घड्याळ’ चिन्हावर लढायची का
दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी करायची की एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत घ्यायची
भाजपविरोधात कोणते अंतिम समीकरण प्रभावी ठरेल
या सर्व मुद्द्यांवर दोन्ही गटांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे–पिंपरीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार नाहीत.“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढली, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात, मात्र मैत्रीपूर्ण लढत देतील,” असे फडणवीस म्हणाले.
शिवसेना (शिंदे गट) भाजपसोबत
राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढवणार आहेत. महापालिका निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मतदारयादीच्या घोळावर स्पष्टीकरण
मतदारयादीतील घोळावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “थोड्या प्रमाणात घोळ असतो, हे आम्हीही मान्य करतो. पण त्यामुळे निवडणुका घेऊ नयेत, हे योग्य नाही. एसआयआर प्रक्रियेमुळे पुढील काळात घोळ कमी होतील. भविष्यात मतदारयादी ब्लॉकचेनवर टाकल्यास हा प्रश्न कायमचा सुटू शकतो.”महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, येत्या काळात आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.