नाशिक : राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्याविरोधात कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदनिका घोटाळाप्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर ही घडामोड समोर आली आहे.मंगळवारी नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच अटक वॉरंट निघू शकते.
दरम्यान, माणिकराव कोकाटे हे आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्याआधीच पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांच्या वकिलांकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. अटक वॉरंटला स्थगिती मिळवण्यासाठी तातडीने अर्ज दाखल केला जाऊ शकतो.
या प्रकरणाचा थेट परिणाम माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरही होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्यास नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. मात्र, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते.यापूर्वी विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. त्या वेळी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, अजित पवार यांनी त्यांचे कृषीमंत्रीपद काढून घेत त्यांना क्रीडामंत्रीपद दिले होते. आता मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाईचा दबाव वाढला आहे.
सदनिका घोटाळा नेमका काय?
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ‘व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये सुमारे 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून वाटप करण्यात आल्या होत्या. या सदनिका माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी मिळवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तत्कालीन राज्यमंत्री (दिवंगत) तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. चौकशीनंतर प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. जिल्हा न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवल्याने आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.राजकीय वर्तुळात या प्रकरणाकडे लक्ष लागले असून, अजित पवार या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे