हिंगोली: काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.भाजपमध्ये प्रवेश करताना प्रज्ञा सातव यांनी सांगितले की, "राजीव सातव यांच्या हिंगोलीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला हातभार लावण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहोत."
हिंगोलीमधील काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज सकाळी त्यांनी विधिमंडळ सचिवांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
प्रज्ञा सातव म्हणाल्या, "माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, राजीवभाऊंचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडवण्यासाठी आम्ही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीवभाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ, सर्वांचे सहकार्य मिळून संकटांवर मात करू."त्यांनी अजूनही सांगितले, "मी आणि माझे कार्यकर्ते हे 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास' या धोरणाने काम करत राहू."