पुणे : बिहार राज्यात दिनांक १५ डिसेंबर रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान नोकरीचे नियुक्तीपत्र देताना एका मुस्लिम महिला डॉक्टरचा नकाब किंवा हिजाब हटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केल्याची कथित घटना समोर आल्यानंतर आज १८ रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी न्यायप्रिय नागरिक, इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणि 'ए एस के ग्रुप लोक दरबार 'सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार नागरिक जमले. बिहारच्या या घटनेच्या देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेला महिला सन्मान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक अधिकारांवर आघात मानत कोंढव्यात न्यायासाठी शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
या वेळी ५० हून अधिक महिला उपस्थित होत्या. इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे अध्यक्ष असलम इसाक बागवान, राजू सय्यद, अलमास शेख, रज्जाक शेख, ए एस के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अहमद समद खान, सौ.मुबीना अहमद खान, अतिक खान, आरिफ खान, मिनाज सय्यद यांच्यासह अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायप्रिय नागरिक, इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणि ए एस के ग्रुप लोक दरबार सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पडले. यावेळी महिला सन्मान आणि संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी आवाज उठवण्यात आला.
महिला सन्मान, संविधानिक मूल्ये आणि न्यायाच्या समर्थनार्थ दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी कोंढवा पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार आणि संजय निषाद यांच्याविरोधात योग्य कायदेशीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती घाडगे तसेच गुन्हे निरीक्षक जगताप यांनी आज एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करू,अशी माहिती दिली.