जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुलानेच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहांचे तुकडे करून ते नद्यांमध्ये फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे.जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहमदपूर गावात राहणारा अंबेश कुमार (वय ३७) याने ८ डिसेंबरच्या रात्री त्याची आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. श्यामलाल हे निवृत्त रेल्वे लोको पायलट होते.
पैशांच्या वादातून हत्याकांड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. एएसपी सिटी आयुष श्रीवास्तव या घटनेबाबत बोलताना म्हणाले की, आरोपी अंबेश कुमारने प्रथम त्याची आई बबिता आणि नंतर त्याचे वडील श्यामलाल, निवृत्त रेल्वे लोको पायलट, यांच्यावर हल्ला केला. त्याचप्रमाणे, आईच्या मृतदेहाचे प्रथम तीन तुकडे करण्यात आले, त्यानंतर वडिलांचे. आरोपीच्या माहितीवरून, पोलिसांनी घरातून मृतदेह कापण्यासाठी वापरलेली करवत, डोकं ठेचलेला वरवंटा जप्त केला आहे. आरोपीने सांगितले की, त्याने स्वयंपाकघरातून वरवंटा आणि घराच्या तळघरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून करवत आणली होती.त्याने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले की, ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्याचे त्याच्या वडिलांशी पैशांवरून भांडण झाले. यामुळे तो खूप संतापला होता. त्यानंतर त्याने त्याच्या आईच्या आणि नंतर वडिलांच्या डोक्यावर वरवंट्याने वार केले. ते दोघेही जमिनीवर पडले. त्यानंतर त्याने घराच्या तळघरातून एक करवत आणली आणि त्यांच्या मृतदेहांचे तीन तुकडे केले. एक भाग डोक्यापासून छातीपर्यंत, दुसरा भाग छातीपासून गुडघ्यापर्यंत आणि तिसरा भाग गुडघ्यापासून पायापर्यंत कापला.
मृतदेह नद्यांमध्ये फेकल्याचा प्रकार उघड
आरोपीने मृतदेहांचे तुकडे पिशव्यांमध्ये भरून आपल्या वाहनातून गोमती आणि साई नद्यांमध्ये टाकले. नंतर नदीत मानवी अवयव आढळून आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
घरातून हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त
आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी घरातून हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त केली आहेत. घटनेनंतर आरोपीने घरातील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे.आरोपीने दोन्ही मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरले आणि ते त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने रात्री घरात सांडलेले रक्त साफ केले. त्याने आपले कपडे पाण्याने धुतले. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो त्याच्या गाडीत मृतदेह घेऊन निघून गेला. त्याने मृतदेहांचे अवयव असलेल्या पिशव्या त्याच्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकून दिल्या. आईच्या शरीराचे तुकडे जलालापूरमधील साई नदीत फेकण्यात आले, जिथे आईचे पाय पाण्यात तरंगताना आढळले.
कौटुंबिक वाद पार्श्वभूमी
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने लॉकडाऊन काळात कोलकात्यातील एका महिलेशी विवाह केला होता. कुटुंबीय या विवाहाला विरोध करत होते. घटस्फोटासाठी पैशांवरून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरोपी पोलीस कोठडीत
पोलिसांना याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, आरोपीने लॉकडाऊन दरम्यान कोलकाता येथील सहजिया नावाच्या मुस्लिम महिलेशी लग्न केले होते, जी कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. कुटुंब तिला सून म्हणून स्वीकारत नव्हते. ते अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणत होते. अंबेश पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पैशाची मागणी करत होता, परंतु तिचे वडील पैसे देण्यास तयार नव्हते, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्या वादानंतर ही घटना घडली आहे.या प्रकरणी आरोपी अंबेश कुमार याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना मानवी नातेसंबंधांवर काळा डाग लावणारी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.