सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 राज्य

महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ;मुख्यमंत्री फडणवीस यांची आदरांजली

डिजिटल पुणे    18-12-2025 18:05:22

नवी दिल्ली :  जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली.

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले होते. आज दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळी मंत्री जयकुमार  रावल यांनी यावेळी आदरांजली वाहिली. श्री.रावल म्हणाले, जागतिक कीर्तीचे महान शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक ऐतिहासिक शिल्पांच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हुबेहूब आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते.त्यांची शिल्पे ही त्यांच्या महान कार्याची नेहमी साक्ष देतील.

 यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले महाराष्ट्राचे सुपुत्र राम सुतारजी यांचे शिल्पकला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी,  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसह अनेक मान्यवरांचे पुतळे बनवले. त्यांनी दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या कलाकृती अजरामर राहतील. त्यांचे पुत्र त्यांचा वारसा चालवतील असेही श्री आठवले यांनी सांगितले.

अंत्यसंस्कारापूर्वी  स्व. सुतार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.  कला,  सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह स्व.सुतार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे  पुत्र अनिल सुतार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

गेल्याच महिन्यात श्री. सुतार यांना  ‘महाराष्ट्र भूषण 2024′ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला.

 मुख्यमंत्री फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुतार यांच्या पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, काहीच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ‘महाराष्ट्र माझा‘ गीताच्या ओळी उच्चारल्या होत्या, तेव्हा आम्ही भारावून गेलो होतो. वयाच्या 100 व्या वर्षीही ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांची शिल्पे शतकानुशतके जिवंत राहतील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेचा ‘कोहिनूर‘ काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अजरामर कलाकृतींमुळे ते सदैव जिवंत राहतील. वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या महापुरुषांच्या शिल्पांद्वारे देशाचा इतिहास जिवंत केला आणि भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक ओळख मिळवून दिली. ग्रामीण भागातून उदयास आलेल्या या साध्या-नम्र शिल्पकाराने आयुष्याच्या शेवटपर्यंत कलेची साधना केली आणि अनेक कलाकारांना घडवले. त्यांची शिल्पे युगानुयुगे आठवण करून देत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री   अॅड . आशिष शेलार यांची शोकभावना

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, राम सुतार यांनी शिल्पांना केवळ आकारच दिला नाही, तर त्यात राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडवले. त्यांच्या प्रतिभेने भारताची ओळख जागतिक पातळीवर उजळून निघाली. हा तेजस्वी वारसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली.


 Give Feedback



 जाहिराती