मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात उघडकीस आलेल्या 145 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नाव जोडण्याचा प्रयत्न चुकीचा व निषेधार्ह असल्याचे सांगत फडणवीस यांनी शिंदेंची स्पष्टपणे पाठराखण केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील सावरी गावात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला होता. ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“साताऱ्यात पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले, यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो पूर्णपणे चुकीचा, अयोग्य आणि निषेधार्ह आहे.”फडणवीस पुढे म्हणाले,“आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा थेट संबंध आढळून आलेला नाही. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी सुरू आहे.”दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले.“माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा किंवा अटक वॉरंटबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सुषमा अंधारेंचा पलटवार
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.“मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे. कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवण्याचे अधिकार न्यायालयाचे आहेत,” असे अंधारे म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या “मी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप करत नाही. मात्र, प्रकाश शिंदे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो आणि तपासावर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून दूर राहावे, ही माझी मागणी आहे.”