मुंबई : जालना व छत्रपती संभाजीनगरमधील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. जालनामधील हवा प्रदुषणासंदर्भात चिंता व्यक्त करून प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.
जालना औद्योगिक वसाहत तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज, शेंद्रा, ऑरिक सिटी औद्योगिक वसाहतींमधील वायू व जल प्रदूषणासंदर्भात आज पर्यावरण मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंग, सहसंचालक (हवा प्रदूषण) सतीश पडवळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जालना औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उद्योगामुळे हवेत धुलीकणांमुळे प्रदूषण होत आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या धुलिकणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे धुलीकणांवर नियंत्रणासाठी संबंधित कंपन्यांनी प्राथमिक हवा प्रदूषण नियंत्रण संयत्रणांमध्ये सुधारणा करून घेण्यासंबंधी त्यांना कळविण्यात यावे. जे अशी यंत्रणा उभारणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये जल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया युनिट कार्यरत आहे. येथील सांडपाण्यावर 100 टक्के पुनर्वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे प्रक्रिया केलेले पाणी खाम नदीत न सोडता त्याचा पुनर्वापर होण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सिंग यांनी जालना व वाळुंज येथील प्रदूषणासंबंधीची माहिती देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये हवा प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे वायू गुणवत्ता निरीक्षण केले जात आहे. तसेच वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी न पाठविणाऱ्या 53 उद्योगांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.