मुंबई : मुंबईतील भाजप आमदार पराग शाह यांनी रस्त्यावर एका रिक्षावाल्याला मारहाण केल्याच्या घटनेवरून राजकीय वाद चिघळला असून, मारहाण झालेला रिक्षावाला मराठी असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरून भाजपवर टीका करताना राऊत यांनी हा प्रकार सत्तेच्या अहंकाराचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी सवाल उपस्थित केला की, “रिक्षावाल्याने नियम मोडला असेल, पण आमदाराला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? भाजप सरकार स्वतः रोज नियम मोडत आहे. मुंबई अदानीला दिली जाते, धारावी आणि मिठागाराची जमीन दिली जाते, तेव्हा पराग शाह यांची हिंमत कुठे जाते?”
नेमकं काय घडलं?
घाटकोपर पूर्व भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवरील अतिक्रमणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार पराग शाह यांनी शनिवारी पाहणी केली होती. यावेळी महात्मा गांधी रोडवर एक रिक्षावाला राँग साईडने रिक्षा चालवत असल्याचे दिसताच पराग शाह संतापले आणि त्यांनी रिक्षावाल्याच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आमदारांच्या कृतीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटण्याची शक्यता
संजय राऊत यांनी मारहाण झालेला रिक्षावाला मराठी असल्याचा दावा केल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसे–ठाकरे गट युतीबाबत मोठा संकेत
याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीबाबत माहिती दिली. मुंबईसह नाशिक, ठाणे, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार असून, जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी युतीची अधिकृत घोषणा धुमधडाक्यात होईल, असा दावा राऊत यांनी केला.