ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान आपापसात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहाड शाखाप्रमुख निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.
या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंतील वादावर अखेर तोडगा निघाला. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले असून आपापसातील वाद मिटल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून महापालिका निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांकडून वेगात सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.