मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा 24 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. बुधवारी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन ठाकरे गट–मनसे युतीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 145 ते 150 जागांवर ठाकरे गट, तर 65 ते 70 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय, युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी 10 ते 12 जागा राखीव ठेवण्यात आल्याचे समजते.
संभाव्य जागावाटप फॉर्म्युला
ठाकरे गट : 145 ते 150 जागा
मनसे : 65 ते 70 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 10 ते 12 जागा
विशेष बाब म्हणजे, 2017 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाने जिंकलेल्या 12 ते 15 जागा मनसेसाठी सोडण्यात आल्या आहेत. या जागांवरील अनेक माजी नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असल्याने ठाकरे गटाकडे तिथे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत मनसेकडे या प्रभागांमध्ये मजबूत उमेदवार उपलब्ध आहेत.
मात्र, भांडूप, विक्रोळी, मुलुंड तसेच कांदिवली, बोरिवली परिसरातील काही वॉर्डांमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. संपूर्ण जागावाटप निश्चित झाल्याशिवाय युतीची घोषणा करू नये, अशी ठाम भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच मुंबईतील अमराठीबहुल वॉर्डांमध्ये निवडणूक रणनीती कशी असावी, यावरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
काल मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवडी आणि दादरमधील जागावाटपाचा तिढा सुटला, मात्र पश्चिम उपनगरांतील काही जागांवरून अद्याप रस्सीखेच सुरू आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असून, 31 डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार एबी फॉर्मकडे लक्ष ठेवून आहेत. जागावाटपाचा निर्णय उशिरा झाल्यास प्रचारासाठी कमी वेळ मिळण्याची शक्यता असून, त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो. यामुळे आजच जागावाटप अंतिम करून उद्या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.