पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राजकारण तापले आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येत असतील, तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
पुण्यात भाजपला शह देण्यासाठी अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या शक्यतेला प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आजच घोषणा झाली, तर मी फक्त शहराध्यक्षपदाचाच नव्हे, तर पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम आपण केले. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास शरद पवार गटाला फायदा होईल, मात्र अजित पवारांसोबत युती केल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल. “निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अशी युती करून कार्यकर्त्यांचे मरण होणार असेल, तर मी पक्षात राहणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आज दुपारी 12 वाजता मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून आलेल्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय घेऊन तो आजच कळवला जाणार असल्याची माहिती आहे.
दोन्ही पक्षांमध्ये अद्याप चर्चा सुरू असून संवादातून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे. मात्र, प्रशांत जगताप यांच्या भूमिकेमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.