कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अधिकृतपणे प्रचारात उडी घेतली आहे. ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं!’ ही नवी कॅम्पेन टॅगलाईन आज प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या हस्ते या टॅगलाईनचे अनावरण करण्यात आले.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करत कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचा रोडमॅप मांडला.
होर्डिंग्जनी वेधलं लक्ष, अखेर गूढ उकललं
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरात प्रवेशद्वारांपासून प्रमुख चौकांपर्यंत ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं!’ या मजकुराचे मोठमोठे होर्डिंग्ज झळकत होते. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर कोणत्याही नेत्याचा फोटो किंवा पक्षाचा झेंडा नव्हता. त्यामुळे हे होर्डिंग्ज नेमके कुणाचे, याबाबत शहरात चर्चेला उधाण आले होते.आजच्या पत्रकार परिषदेनंतर हे होर्डिंग्ज काँग्रेसकडूनच उभारण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
सतेज पाटील काय म्हणाले?
“कोल्हापूर म्हणाल तसं कोल्हापूर आम्ही घडवणार आहोत. शहर कसं असावं, हे नागरिक ठरवतील. नागरिकांकडून सूचना मागवून त्यावर आधारित काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला जाईल,” असं सतेज पाटील यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले,“कोल्हापूरचे मूळ रहिवासी जे देश-परदेशात राहतात, त्यांच्याकडूनही सूचना मागवण्यात येणार आहेत. लंडनमधूनही कोल्हापूरकरांचे फोन आले आहेत.”
४०० पेक्षा अधिक इच्छुक, वॉर्डनिहाय जाहीरनामा
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.“प्रत्येक वॉर्डचा स्वतंत्र जाहीरनामा तयार केला जाईल. पुढील सहा दिवसांत नागरिकांकडून सूचना घेऊन काँग्रेसचा अंतिम जाहीरनामा जाहीर केला जाईल,” अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.
महाविकास आघाडीबाबत संकेत
गेल्या पंधरा दिवसांपासून महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचं सांगत सतेज पाटील म्हणाले,
“आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेसोबत जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबतही चर्चा सुरू आहे. सर्व उमेदवार एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करतील.”
अजित पवारांचा फोन?
“पुणे महापालिकेसाठी अजित पवार यांचा फोन आला होता, हे खरं आहे. मात्र कोल्हापूर किंवा इचलकरंजीसाठी कोणतीही चर्चा झालेली नाही. कोल्हापुरात अजित पवार गटासोबत आमची कोणतीही चर्चा नाही,” असा दावा सतेज पाटील यांनी केला.
महायुतीवर टीका
महायुतीवर जोरदार टीका करत सतेज पाटील म्हणाले,
“महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापूरसाठी दिलेली आश्वासनं मोजली तर ती लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्यासारखी आहेत. नागपूर, रत्नागिरीसाठी वेगळ्या सवलती, पण कोल्हापूरसाठी काहीच नाही. त्यामुळेच इथे आयटी कंपन्या येत नाहीत.”
मुंबईत सर्व जागांवर लढण्याची तयारी
“मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांवर काँग्रेस लढण्यास तयार आहे. काही छोट्या पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मुंबईचा विकास ही काँग्रेसची प्राथमिकता आहे,” असंही सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.
कोल्हापूर महानगरपालिका – थोडक्यात माहिती
एकूण प्रभाग: 20
नगरसेवक संख्या: 81
प्रभाग 1 ते 19: प्रत्येकी 4 नगरसेवक
प्रभाग 20: 5 नगरसेवक
एकूण मतदार: 4,94,711
महिला मतदार: 2,49,000
पुरुष मतदार: 2,44,744
मतदान: 15 जानेवारी
मतमोजणी: 16 जानेवारी