मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका असलेली मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे युतीची औपचारिक घोषणा बुधवारी होण्याची शक्यता असून, जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र मराठी मतांचे एकीकरण, दलित–मुस्लिम मतांची रणनीती आणि काँग्रेसची वेगळी भूमिका ही ठाकरे बंधूंसमोरची मोठी राजकीय कसोटी ठरणार आहे.भाजपसोबत उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता असल्याने मराठी मतदार आपल्या बाजूने कसा वळवायचा, यावर ठाकरे बंधूंची संपूर्ण मदार आहे. विशेषतः मराठी बहुल प्रभागांमध्ये शिवसेना–मनसेची ताकद एकत्र आणताना बंडखोरी रोखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
दलित–मुस्लिम मतांसाठी कठीण समीकरण
महाविकास आघाडीतून ठाकरे बंधू लढणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसने आधीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये या मतांचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला झाला होता. मात्र महापालिका निवडणुकीत हीच मते काँग्रेसकडे वळल्यास ठाकरे बंधूंच्या युतीला फटका बसू शकतो.
मराठी मतदार टिकवण्याची लढाई
मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाकडे जाऊ नयेत, यासाठी ठोस रणनीती आखावी लागणार आहे. स्थानिक मुद्दे, मराठी अस्मिता, महापालिकेतील कारभार आणि विकासाचा अजेंडा या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंना एकसंध भूमिका घ्यावी लागेल.
मित्र पक्षांना सांभाळण्याचं आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सन्मानजनक जागा देऊन त्यांची साथ टिकवणेही महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच संयुक्त वचननामा, प्रचारातील एकवाक्यता आणि नेतृत्वातील समन्वय राखणे हे निवडणुकीतील निर्णायक घटक असतील.मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्याची नव्हे, तर मराठी मतांचे ध्रुवीकरण आणि विरोधी मतदारसंघांचे संतुलन साधण्याची लढाई ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.