मुंबई :नगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधूंची शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे युतीच्या तयारीत असताना, पुण्यात पवार काका-पुतण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापवले आहे.पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर समन्वय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांना थेट लक्ष्य केले आहे.
“अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही” – संजय राऊत
जर पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असेल, तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे स्पष्ट विधान संजय राऊत यांनी केले.“अजित पवारांचे नेते देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर हा महायुतीसाठी मोठा प्रश्न आहे,” असेही राऊत म्हणाले.
पुण्यात वेगळं राजकीय समीकरण
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की,“जर पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र असतील, तर आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत पुण्यात जाणार नाही. मनसे आणि शिवसेना (उबाठा) एकत्र निवडणूक लढवतील. काँग्रेसलाही सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.”
मुंबईबाबत काँग्रेसची भूमिका जवळपास स्पष्ट
मुंबईत ठाकरे बंधूंंसोबत काँग्रेस येणार का, या चर्चांवर जवळपास पूर्णविराम लागला आहे.“मुंबई सोडून इतर काही ठिकाणी काँग्रेस आमच्यासोबत असेल. मुंबईसाठी मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे,” अशी माहिती राऊत यांनी दिली.
उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष
जर मुंबईसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली, तर शरद पवार यांनाही उद्याच्या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण दिलं जाईल, असे राऊत म्हणाले.“शरद पवार सध्या पुण्यात आहेत. ते पत्रकार परिषदेला आले, तर आम्हाला आनंद होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ठाकरे बंधूंसमोर मोठं आव्हान
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले, तरी ते महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवतील का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.काँग्रेसने आधीच एकटे लढण्याची घोषणा केल्याने दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी हे ठाकरे बंधूंसमोर मोठं आव्हान ठरणार आहे.तसेच मराठी बहुल भागातील सर्व मराठी मतं एकत्र आणण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखावी लागणार आहे. उत्तर भारतीय मतदार भाजपच्या पाठीशी जाण्याची शक्यता लक्षात घेता, ठाकरे बंधूंची कसोटी मुंबईत लागणार आहे.