पुणे : इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील गावठाण परिसरात मंगळवारी पहाटे पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी वस्तूने जोरदार प्रहार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मनीषा मल्हारी खोमणे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, मल्हारी उर्फ बापू खोमणे असे आरोपी पतीचे नाव आहे. अज्ञात कारणावरून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास मनीषा घरात आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापवत होती. त्यावेळी पाठीमागून येत मल्हारी खोमणे याने तिच्या डोक्यात लाकडी वस्तूने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे दिसताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
अज्ञात कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी वस्तूने जोरदार प्रहार करून हत्या केल्याची घटना शेळगाव (ता. इंदापूर) येथील गावठाण परिसरात उघडकीस आली आहे. आज मंगळवारी (ता. 23) पहाटे हि घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. गंभीर जखमी अवस्थेत मनीषा यांना उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, पोलिस हवालदार दादासाहेब डोईफोडे, पोलिस कर्मचारी गुलाबराव पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान, आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.