मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देत नमन केले. विशेष म्हणजे, यावेळी एकनाथ शिंदे गुडघ्यावर बसून स्मृतीस्थळाला अभिवादन करताना दिसून आले.
गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळत असून, आज दुपारी 12 वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या घोषणेपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहेत.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने चांगले यश मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले होते. यावेळी शिवसेनेचे मंत्री, नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादनानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर जोरदार टीका केली.
“२५ वर्षे सत्तेत असताना मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. मात्र त्या काळात कोविड खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे झाले. त्यामुळे आता फक्त टोमणे मारण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे,” असे शिंदे म्हणाले.तसेच, “नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे, हे सिद्ध झाले आहे. धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहोचवणाऱ्या राज्यातील मतदारांचे मी आभार मानतो,” असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचा दावा करत, विधानसभा निवडणुकांमध्येही कमी जागा लढवून जास्त जागा जिंकल्या, हा चांगला स्ट्राईक रेट असल्याचे शिंदेंनी अधोरेखित केले. सध्या राज्यात शिवसेनेचे 62 नगराध्यक्ष निवडून आले असून हा आकडा 70 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 33 ‘लाडक्या बहिणी’ नगराध्यक्षपदी निवडून आल्याचे विशेष समाधान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.