मुंबई - नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा देण्याचे काम केले जात आहे. या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक व अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनासमवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत नोंदणी व मुद्रांक विभागाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ते म्हणाले विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची पदोन्नती, रिक्त पद भरती संदर्भात कार्यवाही गतीने करावी. सेवाप्रवेश नियमाबाबत सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल. महसूल विभागाच्या धर्तीवर मुद्रांक व नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करण्याबाबत प्रस्ताव घेण्यात यावा. अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण यशदामध्ये देण्याची कार्यवाही करावी. मुद्रांक व नोंदणी विभागाची जी कार्यालये खासगी जागेत आहेत ती शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत विभागाने जिल्हानिहाय सविस्तर अहवाल तयार करून त्यानुसार आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
एखाद्या दस्ताच्या अनुषंगाने नोंदणी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावयाचा असल्यास याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत माहिती घ्यावी. तसेच एखाद्या दस्ताच्या नोंदी संदर्भात त्रयस्थ व्यक्तीकडून तक्रार आल्यास या तक्रारी संदर्भात पडताळणी करण्यासाठी विभागाने मार्गदर्शक तत्वे निर्गमित करावी, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.