मुंबई : ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यात मनोमिलन होणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रालयात दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याने नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे आणि परिसरातील स्थानिक राजकारणावर या बैठकीत चर्चा झाली. या भेटीनंतर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र होतं. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबईत आपली पकड मजबूत करत गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांना मंत्रिपद देत भाजपकडून बळ देण्यात आलं, त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील तणाव अधिकच वाढला.
मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केल्यानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका झाली होती. तसेच नवी मुंबई महापालिकेत भाजप स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेतही नाईक यांनी अप्रत्यक्षपणे दिले होते.
दरम्यान, मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीसमोरचं आव्हान वाढलं आहे. हीच बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे–नाईक भेटीकडे महत्त्वपूर्ण राजकीय संकेत म्हणून पाहिलं जात आहे.