सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 व्यक्ती विशेष

राज-उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजपने शिंदे गटासाठी जागा वाढवल्या, तरीही अडचण का? नेमकं काय घडलं?

डिजिटल पुणे    25-12-2025 10:49:23

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या युतीमुळे मराठी मतदार एकत्र येण्याची शक्यता वाढल्याने भाजपनेही आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भाजपकडून जागा वाढवून दिल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी कायम असल्याचे चित्र आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मुंबईतील मराठी व्होटबँक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. हा धोका ओळखून आता भाजपने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी 227 पैकी फक्त 52 वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आता राज-उद्धव यांच्या युतीनंतर भाजपने शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपने शिंदे गटाला 52 वरुन 70 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, भाजपच्या या प्रस्तावावरही शिवसेना नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजपने शिंदे गटासाठी जागा वाढवल्या

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. पहिल्या बैठकीत भाजपने शिंदे गटाला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर शिवसेना प्रचंड नाराज झाली होती.राज-उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर भाजपने आपली भूमिका मवाळ करत शिंदे गटासाठी 70 जागांवर लढण्याचा नवा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्तावही शिवसेनेला मान्य नसल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेची 100 जागांची मागणी

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाने भाजपकडे 100 जागांची ठाम मागणी केली आहे. मात्र, भाजपने या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये 25 ते 30 जागांवर तिढा कायम आहे. जागावाटपावरून भाजप-शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असून आज पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

भाजपमध्ये हालचालींना वेग

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री भाजप नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. वर्षा निवासस्थानी उशिरापर्यंत चर्चा झाली असून मुंबईतील उमेदवार निवडीबाबत काही महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती आहे.आज पुन्हा मुख्यमंत्री आणि भाजप कोअर कमिटीची बैठक होणार असून, मुंबई भाजपकडून पाठवण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी मनसेला धक्का दिला

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी सिनेट सदस्य आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक सुधाकर तांबोळी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.सुधाकर तांबोळी हे गेल्या 19 वर्षांपासून मनसेत सक्रिय होते. दोन वेळा ते मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिले आहेत. मात्र, पक्षात अपेक्षित संधी न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

राज-उद्धव ठाकरे यांची युती, भाजप-शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा आणि मनसेतील फूट या सर्व घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आगामी बैठकीत हा तिढा सुटतो की संघर्ष आणखी वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती