उरण : नवी मुंबई विमानतळावरून नियमित उड्डाणे सुरू करण्याची घोषणा होत असताना, या विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे.नोकऱ्या नसल्याने प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रमध्ये संतापाची लाट पसरली आहे.आचारसंहितेचे कारण पुढे करून भूमिपुत्रांच्या अस्मितेच्या लक्ष्याला स्थगिती दिली जाते, मात्र विमान कंपन्यांचे उद्घाटन सोहळे, जाहिरातबाजी आणि उड्डाणांची तयारी यांना आचारसंहिता लागू होत नाही, हा सरळसरळ दुटप्पीपणा असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या असतील, तर त्या बदल्यात मिळणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायही कायमस्वरुपीच मिळाले पाहिजेत. खासगी एजन्सीमार्फत कंत्राटी कामगार भरती करून भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.प्रकल्पग्रस्तांनी एक संतप्त सवाल उपस्थित केला आहे, "ज्यांच्या संघर्षांमुळे नवी मुंबई उभी राहिली, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव भूमिपुत्रांकडून प्रस्तावित आहे. नवी मुंबई विमानतळाला कधी लागणार?" उद्घाटन झाले, उड्डाणे सुरू होत आहेत. मात्र नामकरणाच्या बाबतीत शासन मुद्दाम टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
नामकरणासाठीची अस्मितेची लढाई आचारसंहिता संपल्यानंतर अधिक तीव्रतेने उभी राहीलच. मात्र किमान नवी मुंबई विमानतळावरील कामगार भरतीत तरी भूमिपुत्रांची फसवणूक होऊ नये, यासाठी भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे" ही मोहीम तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता विमानतळ सुरु झाल्याने प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांचा विश्वासघात झाला आहे.